साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात यंदा पावसाने वक्र दृष्टि दाखवल्याने नागरिकांसह मुक्या पाळीव जनावरांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साकोरा येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात महिला व बालगोपाळांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेउन शिविलंग असलेला गाभारा पाण्याने भरवून ठेवत पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे घातले.पावसाळा सुरू होउन तब्बल दोन महिने उलटले तरी साकोरा परिसर संपूर्ण कोरडा असल्याने पेरण्या खोळबंल्या आहेत शिवाय, पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाऊस पडला नाही तर पुढचे दिवस कसे जाणार या चिंतेत गावकरी आहेत. गाव परिसरात वरुणराजाने कृपावृष्टी करावी यासाठी बुधवारी (दि.८) भागवत एकादशीचा मुहूर्तावर गावातील महिला व बालगोपाळांनी उपाशीपोटी सकाळपासून डोक्यावर पाण्याचे हंडे घेउन मंदिरातील शिविलंग व नंदीसह गाभारा पाण्यात बुडवून ठेवला. दिवसभर हरिनामाचा गजर करत महादेवाला साकडे घालण्यात आले. पाऊस नसल्याने परिसरात संपूर्ण व्यवहार, व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच बळीराजा हतबल झाला असून हातमजूरांना कुठलाही कामधंदा नसल्याने उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस पडावा आणि संकट दूर व्हावे यासाठी साकोरा गावातील सर्व महिलांनी मंदिराच्या आवारात गर्दी करून ‘ओम नम: शिवाय’च्या गजरात परिसर दणाणून सोडला होता.नंदू बोरसेंकडून अखंड जपपाऊस येत नसल्याने गावातील जय जनार्दन भक्त परिवारातील नंदू सर्जेराव बोरसे यांनी कपिलेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ बुधवार दि. १ आॅगस्टपासून दिवसभरात फक्त दूध घेवून एका जागेवर बसत ‘नम:शिवाय’ चा अखंड जप सुरू ठेवला आहे. दररोज सकाळी व रात्री उशिरापर्यंत कपिलेश्वर भक्त मंडळातर्फेभजन किर्तनाचा कार्यक्र मही सुरू आहे.
पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:32 PM
साकडे : डोईवर हंडे ठेवून महिलांचा जागर
ठळक मुद्देपावसाने वक्र दृष्टि दाखवल्याने नागरिकांसह मुक्या पाळीव जनावरांचा जगण्याचा प्रश्न गंभीर बळीराजा हतबल झाला असून हातमजूरांना कुठलाही कामधंदा नसल्याने उपाशी राहण्याची वेळ