नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळगी नदी प्रवाहित झाली असून, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भोजापूर धरणात पाणी पोहोचले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी पाहण्यासाठी धरण क्षेत्रावर गर्दी केली होती. दोन दिवसात धरणात नदीद्वारे ६० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने ४० टक्के धरण भरले आहे. धरणात आजमितीस १४६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून भोजापूर धरणाची ओळख आहे. नांदूरशिंगोटे व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न धरणाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने प्रत्येकाला धरण भरण्याची अपेक्षा असते. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील गावांची तहान भागवत असलेल्या भोजापूर धरणात पाणी येऊ लागल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी धरण क्षेत्रात तसेच उगमस्थानवर सुद्धा पावसाचे प्रमाण कमी असल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली नव्हती.
म्हाळुंगी नदीचे उगम क्षेत्र असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विश्रामगड, पाचपट्टा भागात रविवारी व सोमवारी पाऊस झाला. नांदूरशिंगोटे परिसरात सुद्धा पूर्वा नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तसेच परिसरातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी, भोजापूर धरणात पाणी साठा होऊ लागल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाऊस झाल्यामुळे काही दिवसांनंतर हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. ठाणगावपासून सोनेवाडीपर्यंत असलेले म्हाळुंगी नदीवरील छोटे-मोठे बंधारे भरून सोमवारी (दि.१३) दुपारी चार वाजेच्या सुमारास भोजापूर धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणात पाणी आल्यामुळे भविष्य काळात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्वच नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात अल्प प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होता. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत धरणात ११० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात बुधवारी सकाळ पर्यंत ४० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
-------------------
पावसामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित
उगम क्षेत्रात संततधार सुरु असल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली आहे. नदीद्वारे धरणात ३५० क्युसेसने पाण्याची आवक होत असून दिवसभरात १५ ते २० टक्के पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी भोजापूर धरण १५ ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरले होते व म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत होती. तसेच नदी व कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील गावांना पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र यावर्षी पावसाळा संपत आला तरी धरणात ४० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उगमक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढेल अशी आशा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
----------------------------
फोटो ओळी : सिन्नर व अकोला तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसाने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली असून नागमोडी वळण घेत नदीचे पाणी भोजापूर धरणात दाखल झाले आहे. (छाया : सचिन सांगळे) (१५ म्हाळुंगी)
150921\15nsk_6_15092021_13.jpg
१५ म्हाळूंगी