नाशिक : शहरातील पाथर्डी परिसरासह अन्य भागाला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणारी योजना आता पूर्णत्वास येत असून, गेल्या शुक्रवारपासून प्रत्यक्ष चाचणी सुरू झाल्यानंतर बुधवारी (दि. १२) रात्री पाणी नाशिकच्या वेशीपर्यंत म्हणजेच विल्होळी जकात नाक्याजवळ बांधण्यात आलेल्या जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे वॉश आउट आणि अन्य चाचण्या आता पूर्ण होत असून, महापालिकेने ठरविल्यास पुढील आठवड्यापर्यंत प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यास सुरुवात होणार आहे.नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरी वसाहती लक्षात घेऊन महापालिकेने गंगापूर धरणातील थेट जलवाहिनी योजनेप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली होती. सुरुवातीला केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत २२० कोटी रुपयांची ही योजना मांडण्यात आली होती; मात्र पहिल्या टप्प्यात ही योजना सादर होऊ शकली नव्हती. नंतर वाढीव अभियानात तिचा समावेश करण्यात आला. त्यानंतर २६६ कोटी रुपयांची योजना सुमारे पावणेदोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. गेल्या वर्षीच योजनेची मुदत संपल्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरीस आता ही योजना पूर्ण होत आहे.नाशिक शहरापासून १६ किलोमीटर लांब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून पाणी उपसा करून ते पाणी विल्होळी जकात नाक्याजवळ उभारण्यात आलेल्या १३७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रात हे पाणी पोहोचणार असून, तेथून एकूण शहरातील क्षेत्राच्या ३० टक्के भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. योजनेचे काम पूर्णत्वास येत असताना गेल्या शुक्रवारपासून धरणातील पाण्याचा उपसा करून रोज दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीत टप्प्याटप्प्याने सोडले जात होते. त्यातून जलवाहिन्यांची चाचणी करताना गळतीदेखील तपासली जात होती; मात्र जलवाहिन्या पूर्ण चार्ज केल्या जात नव्हत्या.बुधवारी हे पाणी पूर्णत: जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत आले असून, त्याची अंतिम चाचणी केली जात आहे. त्यामुळे आता या योजनेतून पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चारशे दशलक्ष लिटर्स पाणी प्रतिदिनपाथर्डी फाटा येथे महापालिकेने जलशुद्धिकरण केंद्र बांधले असून, संपूर्ण योजनेत चारशे दशलक्ष लिटर्स पाणी प्रतिदिन उचलता येणार आहे. द्वारकापर्यंत महामार्ग क्रमांक तीन तसेच आनंदनगर, उपेंद्रनगर, आश्विननगर, मोरवाडी, बडदेनगर, भाभानगर, कथडा, गोडेबाबानगर या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मुकणेचे पाणी नाशिकच्या वेशीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:30 AM