दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना नेहमीच पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने दरेगाव येथे अधिक पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या ठिकाणी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाणी ओढताना दमछाक होते. पाण्यासाठी ग्रामस्थांना भरउन्हात परिसरातील विहिरीवर पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.गावालगत असलेल्या विहिरींनी व कूपनलिकेने तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावालगत असलेल्या बोरवेलची पातळी खालवल्याने एक एक हंडा पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना ताटकळत उभे रहावे लागते तर त्यात भारनियमन असल्याने रात्रीच्या वेळी हंडाभर पाण्यासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे.एक महिन्यापासून ग्रामपंचायत पाण्याचा टँकर विकत घेऊन गावाला पाणीपुरवठा करत आहे. परंतु नागरिकांना पाणी मुबलक मिळत नसल्याने गावात अधिक पाणीटंचाई होत असल्याने येथील ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्याची मागणी चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. गटविकास अधिकारी यांनी या प्रस्तावाची दखल घेत दरेगाव येथे येऊन पाहणी करून दोन दिवसात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सी. जी. मोरे, ग्रामसेवक एम. आर. डांगरे, दौलत अहिरे, संजय गरुड, बाळू गरुड व ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम खरात, बाळू खरात उपस्थित होते.
दरेगावी महिलांची पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:30 PM