लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर व आळंदी धरणाला लागून असलेल्या गयाची वाडीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास असली तरी, गावाला जेमतेम दोनशे लिटर पाणी मिळत असल्याने पिण्याचे पाणी हा गावात कळीचा मुद्दा झाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने धरणात आता जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे जनावरे जगू शकतील, पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना बोअरवेलवर अवलंबून रहावे लागत आहे. एरव्ही भरपूर पाणीपुरवठा करणारी बोअरवेल दिवसा फक्त दोनशे लिटरच्या आसपास पाणी देत असून, गेल्या महिनाभरापासून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. बोअरवेलमध्ये जेव्हा पाणी येईल तेवढ्यावर पाण्याची टाकी भरून घ्यावी लागते आणि तितकेच पाणी गावासाठी देण्यात येते. जेमतेम दोनशे लिटर पाणी गावासाठी देण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या १२०० तर पाणीपुरवठा दोनशे त्यामुळे पाण्यावरून नेहमी वाद होत असल्याचे दिसत आहे. भाग असल्याने या भागात सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी गावातील महिलांनी सांगितले. शासकीय कामे सोडता गावातील लोकांचा दिंडोरीशी काहीही संबंध येत नसल्याने सर्व दैनंदिन व्यवहार गिरणारे गावाशी होत असल्याने पाणीप्रश्नाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी येथील ग्रामस्थ दिंडोरीला जाण्यासाठी धजावत नाहीत.