कळवण : उत्तर महाराष्ट्रातील आराध्यदैवत सप्तशृंगीगडावर दरवर्षाप्रमाणे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. चैत्रोत्सव काळात नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा भीषण सामना गडावरील स्थानिक तसेच भाविकांना करावा लागणार आहे.स्थानिक व्यावसायिकांना नांदुरी किंवा इतर ठिकाणांहून विकतचे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. उत्तम नियोजन करून यंदा चैत्रोत्सव काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असे सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले. सप्तशृंगी गडापासून पाच किलोमीटर असलेल्या भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या भवानी पाझर तलावाचे पाणी आटत असून, परिसर पूर्णपणे मोकळा दिसत आहे. भवानी पाझर तलावाचे काम जिल्हा परिषदेमार्फत झाले असून, निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाणी जास्त काळ साचून राहत नाही. सप्तशृंग ट्रस्टने भवानी तलावाची उंची एक मीटरने वाढवून साठवण क्षमता वाढविण्यासाठी ५० लाखांचा खर्च केला. पाणी गळती थांबविण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करण्यात आला, मात्र त्याचा विशेष फायदा झाला नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रात्री वेळी-अवेळी पाण्यासाठी जावे लागत आहे. महिला वर्गाची पहाटेपासूनच हातपंपावर नंबर लावण्यासाठी झुंबड उडते. गडावर अवघ्या काही दिवसांत चैत्रोत्सवाला सुरु वात होत आहे. त्यासाठी राज्यातून व परराज्यातून २० ते २५ लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडावरील पाणीटंचाईचा विचार करता भाविकांना विकतचे पाणी प्यावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने आत्ताच पाण्याची समस्या उभी ठाकली असून, आता केवळ फेब्रुवारी महिना आहे. पुढील मार्च ते मे महिन्यात काय होईल ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने जर कामांना गती देऊन नियोजनपूर्वक कामे केली तर निश्चितच पाणीटंचाईची समस्या कमी होईल. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर पाण्याची समस्या गंभीर
By admin | Published: February 18, 2015 11:56 PM