नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यतादेखील निर्माण झाली आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे, तर नदीवरील रामसेतू पुलावरून पाणी वाहू लागले आहे. काठलगतचे नारोशंकराचे मंदिरही अर्धेअधिक पाण्यात बुडाले असून नदी रौद्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकला अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत वाढ झाली असल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असताना गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गंगापूर धरणक्षेत्रात सकाळपासून दमदार पाऊस बरसल्याने गंगापूर धरणाची पातळी ९८ टक्केच्या पुढे गेल्याने सकाळपासून गंगापूर धरणातून विसर्ग केला जात आहे. सकाळपासून सुमारे ८१२१ क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पात्रातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे.
गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने सकाळी ८.३० वाजता धरणातून १००० क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. सकाळी ११ वाजता तर २००० हजार क्युसेकने पाण्याचा वेग वाढविण्यात आला. तर, तासाभरानंतर एकूण विसर्ग ४००० क्युसेक इतका करण्यात आल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने पूर वाढला. अवघ्या तासाभरानंतर पुन्हा विसर्गाचा टप्पा वाढविण्यात येऊन ६००० क्युसेक तर दुपारी तीन वाजेनंतर ८१२१ क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राची पातळी वाढल्याने काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
काठावर असलेले नारोशंकर मंदिर अर्धेअधिक बुडाले, तर गांधी तलावालगत असलेल्या दशक्रिया छत्रीच्या छताला पाणी लागले. देवमामलेदार मंदिराचेही दाेन मजले पाण्याखाली बुडाले, तर गंगा-गोदावरी मंदिरही पाण्याखाली आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.