नाशिक : नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. परंतु, स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभाग आवश्यक असून, पक्षभेद विसरून सर्वांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्मार्ट सिटी’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.नाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने हॉटेल ‘द ताज गेटवे’ याठिकाणी एकदिवसीय स्मार्ट सिटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटक गिरीश महाजन यांनी सांगितले, देशभरातील ९८ शहरांच्या यादीत नाशिकची निवड झालेली आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या साऱ्या दृष्टीने नाशिक परिपूर्ण शहर आहे. शहरात विकासासाठी मोठ्या संधी आहेत. केवळ टापटीप कपडे घातले म्हणजे माणूस स्मार्ट होत नाही, तर त्याचे बौद्धिक, शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शहराचेही आहे. उड्डाणपूल, चांगले रस्ते बांधले म्हणजे शहर स्मार्ट होत नाही. शहराला लागणाऱ्या मूलभूत गरजांची व्यवस्थाही महत्त्वाची आहे. शहरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत. राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये सापडले आहेत. अशा स्थितीत आरोग्यविषयक उपयुक्त प्रकल्प उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट नाशिक अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. बदलण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पूरक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे. शहरात उद्योग वाढीस लागले पाहिजेत. पीपीपी तत्त्वावर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना अडचणी येतील; परंतु लोकसहभागाशिवाय शहर स्मार्ट होणे अशक्य असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, महापौर रंजना भानसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची मांडलेली संकल्पना तडीस नेण्यासाठी सर्वांचा पुढाकार असणे आवश्यक असल्याचे सांगत, कुंभनगरीत विकासाच्या योजना राबविण्याबरोबरच गावठाणाचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले. ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन प्रा. लिमिटेडचे जनरल मॅनेजर जोसेफ माप्राईल, नार्वेच्या कौन्सिल जनरल अॅन ओल्लेस्टड यांनीही मनोगत व्यक्त केले. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी स्मार्ट शहरासाठी नियोजनावर भर आवश्यक असल्याचे सांगत, स्मार्ट शहरांमुळे रोजगाराची क्षमता वाढून लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. प्रारंभी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणाºया प्रकल्पांची माहिती देत, भविष्यात अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी आभार मानले. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.‘प्रकल्प गोदा’कडे विशेष लक्षपालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्प राबविला जाणार असून, त्याकडे सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. गोदावरी नदी ही शहराची जीवनदायिनी आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प गोदाद्वारे शहराच्या पर्यटनाला तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. गोदावरी पात्रातील कॉँक्रिटीकरण काढावे की नाही याबाबत अभ्यासांतीच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.
‘स्मार्ट नाशिक’ होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:23 PM
स्मार्ट सिटी परिषद : नाशिक महापालिका व कंपनीच्यावतीने दिवसभर चर्चासत्राचे आयोजन
ठळक मुद्देनाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने एकदिवसीय स्मार्ट सिटी परिषदेचे आयोजनस्मार्ट सिटी अंतर्गत कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत