मनेगावसह सोळागाव नळपाणीपुरवठा योजनेत गावाचा समावेश असून योजनेचे पाणी वाड्यावस्त्यांवर अद्यापपर्यंत पोहचले नाही. येथील हनुमानवाडी, जाधववस्ती, भगतमळा, बहिरू आबाजी मळा, भांगरे मळा, पाटील परिट मळा, दत्तवाडी, कडलग मळा व आमदार मळा या वाड्यावस्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने वस्तीवरील विहीरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाण्याचा कुठेच स्त्रोत नसल्याने महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गत वर्षापासून वाड्यावस्त्यांचे टॅँकर बंद असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीस्तरावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तसेच १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत वाड्यावस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीचा ठराव करून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता. अद्यापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शनिवारी तहसीलदार नितीन गवळी यांची भेट घेवून पाणी टंचाई संदर्भात गाºहाणे मांडले. आठवडाभरात वाड्यावस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास ८ सप्टेंबर रोजी सिन्नर बायपास येथे ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर सरपंच सुहास जाधव, उपसरपंच अण्णा कडलग, राष्टÑवादीचे राजाराम मुरकुटे, अॅड. संजय सोनवणे, नितीन शिंदे, रामा बुचूडे, योगेश माळी, शिवाजी सोनवणे, सागर सोनवणे, दीपक सोनवणे आदिंसह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.