नाशिक : मे महिना सरतांना जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पांगरीत पाण्यासाठी तहानलेल्या नागरिकांनी महिलांसह तळपत्या उन्हात अक्षरश: रस्त्यावर उतरत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, तर ब्राह्मणवाडे येथे आठवडाभर पाणी मिळाले नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.
पांगरीत रास्ता रोको : सिन्नर-शिर्डी रस्ता रोखला
सिन्नर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी सिन्नर- शिर्डी रस्त्यावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही. टंचाईग्रस्त गावांना त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पांगरी ग्रामपंचायतीस रिकाम्या घागरी देऊन आंदोलन करण्यात आले.
ग्रामसेवकाला कोंडले
आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी ग्रामसेवकाला त्यांच्या कार्यालयांमध्ये डांबून बाहेरून टाळे ठोकले. आंदोलनासाठी महिला रिकामे हंडे घेऊन आल्या होत्या.
महिलांचा हंडा मोर्चा
ब्राह्मणवाडे येथे पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. गेल्या आठवड्यापासून गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला. (अधिक वृत्त : हॅलो)
फोटो :२६ पांगरी २