लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : एकेकाळी पावसाचे माहेरघर समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात राज्याच्या सीमेवरील पेठ तालुक्यात प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव असल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षीही प्रशासनाने पाणीटंचाईचे ग्रहण दूर करण्यासाठी सादर केलेल्या टंचाई आराखड्यात ६२ गावे व ३४ वाड्यांचा समावेश केला आहे.
साधारण १ लाख ३७ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेठ तालुक्यात २००च्या वर गावे व वस्त्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पेसा निधी व काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बहुतांश गावांना पाणीपुरवठा केला जात असून, विजेचे भारनियमन, विजेचा कमी दाब, वनविभागाचे अडथळे यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तालुका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ अखेर तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये प्रगतीत नळयोजना, विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, खासगी विहिरी अधिगृहित करणे, टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, बुडक्या विहिरी आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, टंचाईग्रस्त गावांच्या मागणीप्रमाणे पुढील काळात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांचे योगदान
पेठ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना लोकवर्गणीच्या माध्यमातून टँकरमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थांनी योगदान दिले असून, सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून गढईपाडा, वाजवड, शेवखंडी, खोटरेपाडा, फणसपाडा, पांगूळघर, खोकरतळे, एकदरे या गावांना पाणीपुरवठा योजना राबवली असून, आपली आपुलकी बहुद्देशिय संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे यांनी बोंडारमाळ गाव टंचाईमुक्त केल्यानंतर सध्या घुबडसाका गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याचे काम हाती घेतले आहे.
सिंचन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत
पेठ तालुक्यात सद्यस्थितीत आठ लहान मोठी धरणे असली तरी त्यांची क्षमता कमी असल्याने शिवाय एकाही धरणापासून पिण्यासाठी पाणी उपसा होत नसल्याने त्यांचा टंचाई निवारणासाठी फारसा उपयोग होत नाही. तालुक्यातील जवळपास ७ नवीन मध्यम व लघू सिंचन प्रकल्प शासनस्तरावर मंजुरीचा प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या प्रकल्पासून उपसा जलसिंचन योजना राबवून एका धरणातून अनेक गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची गरज भासू लागली आहे.
इन्फो...
असा आहे टंचाई आराखडा...
एकूण गावे
६२
एकूण वाड्या
३४
प्रगतीत नळ योजना
४
विंधन विहीर घेणे
२८
नळ योजना दुरुस्ती
७
विहीर खोलीकरण
१५
खासगी विहीर अधिगृहण
३१
संभाव्य टँकर संख्या
९
फोटो - २० पेठ १
इनामबारी धरण
===Photopath===
200421\20nsk_6_20042021_13.jpg
===Caption===
इनामबारी धरण