वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : महाराष्टÑात प्रत्येक गाव-शहर, वाड्या-वस्त्या कोरोना संकटाचा सामना करत असतानाच तालुक्यात सालाबादप्रमाणे पाणीटंचाईचेही संकट ओढवले आहे. तालुक्यातील विनायकनगर व वेळे येथील पाणी मागणीचे प्रस्ताव या हंगामात पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर याठिकाणी स्वतंत्र टॅँकर सुरू करण्यात आले आहे, तर सोमनाथनगर आणि मुरंबी या गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहरालाही आता पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.------------------म हाराष्ट्रात कोरोना संकटाबरोबर पाणीटंचाईचे संकट उद्भवले आहे. तालुक्यातील आदिवासी - दुर्गम भागात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे. कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण त्याअगोदर तहानेने जीव जायला नको, अशी भावना आदिवासी बांधव व्यक्तकरत आहेत. लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही. दोन पैसे मिळण्याच्या आशा दुरावल्याने खाण्यास काही नाही. एकीकडे उपासमार,कोरोनाचे वाढते संकट आणि आता पाण्यासाठी महिलांबरोबर पुरुषांनादेखील दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्याला महाराष्ट्रातील चेरापुंजी समजले जाते. येथे सरासरी १५००पासून ते ४५०० मि.मी., पाऊस पडत असतो. तरीही दरवर्षी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाण्याची सरासरी त्र्यंबकेश्वर, वेळुंजे व हरसूल या तीन गावांतील जलमापकाच्या एकूण बेरजेच्या २२५० मि.मी. इतकी आहे. तरीही पावसाचे प्रमाण निसर्गाच्या लहरीवर कमी-अधिक प्रमाणात अवलंबून असते. यावर्षी तालुक्यात विनायकनगर व वेळे येथील पाणीटंचाईचे पहिले प्रस्ताव दाखल झाले. त्याची पडताळणी झाल्यानंतर या दोन्हीही गावांना स्वतंत्र टँकर सुरू आहेत.सोमनाथनगर व मुरंबी या गावांचे प्रस्ताव ८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली. मागील वर्षी अवघे तीन गावे व २१ वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. ही आकडेवारी सरकारी असली तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या त्याहून जास्त होती. मागील वर्षी श्रीराम फाउण्डेशन, जैन फाउण्डेशन, सोशल नेटवर्किंग फोरम व खालसा या स्वयंसेवी-सेवाभावी संस्थांनी टंचाईग्रस्त गावाची पाण्याची तहान भागविली होती. सोमनाथनगर, वेळे, मुळेगाव, मेटघर किल्ला आदी ठिकाणी टँकरने तर मेटघरसारख्या उंच ठिकाणी पाइपलाइन टाकून मोटरने पाणीपुरवठाकरण्यात आला होता. दरम्यान, तालुक्यात बेझे येथील गौतमी गोदावरी प्रकल्प तर अंबोली, वायघोळपाडा, जातेगाव बु., रोशनी, चिंचवड, वाघेरा, कोणे, अंबई, काचुर्ली (तळेगाव), टाके, देवगाव आदी गावांना लघुपाटबंधारे तलाव आहेत.तथापि त्यात महत्त्वाचा फक्त गौतमी प्रकल्प आहे. पण त्या पाण्याचा अहमदनगर -मराठवाड्याकडे विसर्ग केला जातो. त्याचा तालुक्याला फारसा उपयोग नाही. त्यात त्र्यंबकेश्वरशहरासाठी फक्त १० टक्के पाण्याचे आरक्षण आहे. तेही सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मिळाले आहे. एप्रिल- मेदरम्यान त्र्यंबकेश्वर शहराला पाण्याचा तुटवडा भासत असल्याने महिन्यातून १४ ते १५ दिवस पाणी मिळते तर कधी आठ दिवस पाणी मिळते. त्र्यंबकेश्वर शहराला अंबोली, बेझे तसेच अहिल्या जलाशयातून पाणी मिळते तरीही पाण्याची धग जाणवतेच.----------------------शासनाच्या आदेशामुळे कामे ठप्पतालुक्यात मागील वर्षी दहा कामे तत्कालीन सरकारने मंजूर केली होती. पण दहापैकी फक्त चारच कामांना मंजुरी देऊन निविदा आदी सोपस्कार पार पाडून चार कामे प्रगतीत असल्याचा सरकारी यंत्रणेचा अहवाल आहे. बहुतेक कामांची मुदतही संपून गेली आहे. अजून कामे प्रगतीतच आहेत, तर अन्य सहा कामे मागच्या सरकारने थांबविली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारनेदेखील पाणीपुरवठा विभागाची उर्वरित सहा कामे थांबवून ठेवली आहेत, तर चालूवर्षी एकही नवे काम मंजूर केलेले नाही. पाणीटंचाई एकाच गावाला नाही तर संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. यासाठी तालुक्यात दरवर्षी आॅक्टोबर - नोव्हेंबरमध्ये टंचाई आराखडा तयार केला जातो.------------------------सन २००८-०९ मध्ये नियोजित किकवी प्रकल्पाने जोर धरला होता. २०१२ ते २०१५ पर्यंत नाशिक पाटबंधारे विभागापासून ते थेट दिल्लीपर्यंत मंजुरी मिळाली. वनविभागाचाही ग्रीन सिग्नल मिळाला होता. मुख्य म्हणजे निधीचीदेखील तरतूद झाली होती. दरम्यान केंद्रात सरकार बदलले आणि सारेच चित्र पालटले.--------------------------------सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्यक्रम दिला जात असला तरी तालुक्यातील टंचाई परिस्थितीकडेही डोळेझाक करून चालणार नाही, याची जाणीव आहे. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार टँकर मंजूर करावेच लागणार आहेत. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पडताळणीच्या वेळेस टंचाईग्रस्त गावांच्या विहिरीतील पाण्याचे स्रोतही दुर्लक्षून चालणार नाही. तसेच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पोहचविण्यासाठी दानशूर संस्थांचीदेखील मागील वेळेप्रमाणे मदत घेतली जाईल. गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आपण स्वत: व गटविकास अधिकारी आमची दोघांची आहे. पाण्याबाबत कोणीही तहानलेला राहणार नाही याबाबतची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.- दीपक गिरासे,तहसीलदार, त्र्यंबकेश्वर
पाणीटंचाई पाचवीला पुजलेली; यंदा पुन्हा गहिरे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 9:45 PM