नाशिक : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळसदृश परिस्थितीची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मान्सूनचे आगमन होऊनही जिल्ह्णात जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच झड लावल्यामुळे नद्या, नाले दुतर्फा भरून वाहिले तर तळ गाठलेल्या विहिरींनाही पाणी लागल्यामुळे बºया प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास सुरुवात झाली. तथापि, जिल्ह्णातील मालेगाव, बागलाण, सिन्नर, येवला, नांदगाव, देवळा, चांदवड या तालुक्यातील काही गावांना पाऊसच न झाल्यामुळे भर पावसाळ्यात या ठिकाणी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यात ५४ गावे, १५७ वाडे अशा २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होऊ लागली असून, त्यामुळे नजीकच्या काळात टॅँकर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कमी अधिक पाऊस होऊन काही प्रमाणात पिकांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली असली तरी, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली. त्यामुळे सलग दोन महिने टंचाई कृती आराखड्याला मुदतवाढ देण्याची वेळ आली. आताही सप्टेंबर महिन्यात उन्हाचा तडाखा वाढताच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.
जिल्ह्यातील २११ गावे, वाड्यांना पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:44 AM