नगरसूल : सतत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ अन् भीषण पाणीटंचाईने सध्या येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व भागातील मनुष्य प्राण्यासह पशु-पक्ष्यांना हैराण केलेच आहे, पण आर्थिंगसाठी केवळ ‘पाणी’ नाही म्हणून राजापूर (ता. येवला) येथील वीज उपकेंद्राला चांगलाच ‘शॉक’ बसला आहे.दुष्काळातून उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईमुळे कोणीच सुटत नाही. याचाच ज्वलंत प्रत्यय येवला तालुक्यातील राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र सध्या घेत आहे. येथील उपकेंद्र आवारात कर्मचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून कर्मचारी वसाहत उभी आहे, पण पाणीटंचाईमुळे एकही कर्मचारी राहत नाही अन् अशातच गेल्या काही दिवसांपासून उपकेंद्राच्या आर्थिंगसाठीच पाण्याची वानवा निर्माण झाल्याने परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणला विकतचे पाणी घेऊन आर्थिंगसाठी टाकावे लागत असल्यामुळे चांगलाच आर्थिक ‘शॉक’ बसत आहे.राजापूर वीज उपकेंद्रातून परिसरातील ३२ गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या उपकेंद्रातील यंत्रणाही अद्यावत केल्या आहेत. पण गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ यंदाच्या वर्षी जास्तच असल्याने, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रब्बी तर नाहीच, पण खरिपाचीही पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. गेल्या आठवडाभरापासून विकतचे पाणी वीज कंपनीला घ्यावे लागत असून, चांगलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.या उपकेंद्रात एक शाखा अभियंता, स्थानिक वायरमन, आॅपरेटर असे १२ कर्मचारी असून, त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चाच्या दोन कर्मचारी इमारती बांधल्या आहेत. परंतु या ठिकाणी कोणीच राहत नसल्याने, त्यांचीही चांगलीच दुरवस्था बघायला मिळत आहे.(वार्ताहर)
येवल्याच्या उत्तर पूर्व भागात पाणीटंचाई;
By admin | Published: December 05, 2014 12:07 AM