घोटी : इगतपुरी तालुक्यासह लगतच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले असून, ग्रामसेवकाच्या नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, शुक्रवारी पाणीटंचाई दूर करण्याची ग्रामसेवकाकडे मागणी करणाऱ्या ग्रामस्थांची आणि ग्रामसेवकाची बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. याबाबत ग्रामसेवकाने एका नागरिकाविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या-प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या झिऱ्याची सफाई करावी. जेणेकरून स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच झिऱ्याची खोली वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसेवक गणेश जयराम पगारे यांच्याकडे अनेकदा केली होती. मात्र ग्रामसेवकाने मागणीकडे दुर्लक्ष करीत याउलट प्रथम शौचालये बांधा, दारूबंदी करा व नंतर इतर कामे सांगा अशी भूमिका घेतली.सदरचा ग्रामसेवक गावात आला असता गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा झिरा स्वच्छ करण्याची मागणी लावून धरली. यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामसेवकांत बाचाबाची आणि हाणामारी झाली. मुबलक पाण्याची मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने लढा देणाऱ्या रामदास भाऊ शिद याने गावात शौचालय आणि दारूबंदीची मागणी केल्याने आपणास मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक गणेश पगारे याने घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)
पाणीटंचाई : शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल
By admin | Published: May 23, 2015 11:49 PM