पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ठाणगाव गावाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मागील ग्रामपंचायत सरपंच गणपत भवर व सदस्य मंडळाच्या वतीने पाठपुरावा करून सुमारे पन्नास लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. त्यानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून सुमारे पाच किलोमीटर पाइपलाइन तसेच गावांतर्गत पूर्ण पाइपलाइन करण्यात आली आहे; परंतु विहिरीचे काम अद्यापही करण्यात न आल्याने पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामस्थ कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठाणगावला पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 6:56 PM