कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ महिलांवर आली असून पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागत आहे. आरम नदीचे पात्र कोरडे ठाक पडल्याने सात ते आठ गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने येथील ग्रामस्थांना दोन दिवसाआड अल्प पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. केळझर धरणातून आरम नदीला तात्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी बागलाण तालूका राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाणच्या पश्चिम पट्टयातील डांगसौदाणे, कंधाणे, निकवेल, जूनेनिरपुर, नवेनिरपुर, खमताणे, मुंजवाड, आदि गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांशी गावांच्या सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना आरम नदीच्या पाण्यावर विसंबुन असुन नदीला पाणी तर गावाला पाणी असे समीकरणच बनले आहे. सध्या आरम नदीचे पात्र कोरडेठाक पडले असून यामुळे या गावांची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विहीरीतच पाणी नसल्याने गाव प्रशासनापुढे पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. दररोज प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनांबरोबरच शेतीसिंचनाचाही पाणीप्रश्न गंभीर बनल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे केळझर धरणातून आरमनदीत पाण्याचे आवर्तन सोडून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्याची मागणी बागलाण तालूका राष्ट्रवादी युवक कांग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे. वाढत्या तपमानामुळे धरणातील जलसाठ्यांचे बाष्पीभवन होत असल्याने प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, दोन दिवसात आवर्तन न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:01 PM