सटाणा : बागलाण तालुक्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पाचे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (दि. ११) जलनियोजन केले. या नियोजनात हरणबारी धरणाचे पाणी पूर्णपणे पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले आहे, तर केळझरमधून फक्त एक आवर्तन शेतीसाठी व उर्वरित दोन आवर्तने पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. हरणबारी धरणातून येत्या १५ डिसेंबरला पहिले आवर्तन, तर केळझरमधून २० ते २५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहेत.यंदा अपुऱ्या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईसदृश चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. हे जलसंकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला जलनियोजन करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. या नियोजनात हरणबारी धरण लाभक्षेत्रातील रब्बीचा पेरा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, सुमारे ११६६ दलघफू उपलब्ध पाणीसाठा पूर्णपणे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या राखीव पाण्यामध्ये दोन आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिले आवर्तन येत्या १५ डिसेंबरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या आवर्तनाचे पाणी मालेगावपर्यंत पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे. ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणामध्ये ५७१ दलघफूच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी पूर्वीच्या सटाणा शहरासाठी आरक्षित असलेल्या साठ्यात वाढ करून तो २८० दलघफू करण्यात आला आहे. या नियोजनात तीन पाण्याचे आवर्तन ठेवण्यात आले असून, पहिले आवर्तन हे शेतीसाठी ठेवण्यात आले आहे. ते येत्या २० ते २५ डिसेंबरदरम्यान सोडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काल जलसंपदा विभागाला दिले आहेत. (वार्ताहर)
पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच राखीव
By admin | Published: December 12, 2015 10:30 PM