नाशिक : ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ११ कोटी रुपये देवळा, नांदगाव नगरपालिकेकडे थकले असून, या संदर्भात वारंवार तगादा लावण्यात येऊनही नगरपालिकेकडून पैसे भरण्यास चालढकल केली जात असल्याने येत्या महिनाभरात नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन पैशांची मागणी करण्याचा अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. विविध विभागांचा आढावा घेतला जात असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर चर्चा करण्यात आली. अकरा कोटीच्या थकबाकीपोटी फक्त १० लाख रुपये वसूल झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता नरवडे यांनी दिली. कोविडमुळे नगरपालिकांकडे पैसे नसल्याचे कारण दिले जात असून, या संदर्भात वारंवार तगादा लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याच बरोबर देवळा व नांदगाव नगरपालिकेने पाणीपट्टी आकारणीच्या दरावर आक्षेप घेत पैसे भरण्यास टाळाटाळ चालविल्याचे नरवडे यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी हस्तक्षेप करीत, या संदर्भात देवळा व नांदगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून, देवळा नगरपालिकेने तशी तयारी दर्शविली आहे. तथापि नांदगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव करून पाणीपट्टी न भरण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी आकारणीच्या दराबाबत त्यांचे समाधान केले जात असून, काही अंशी त्यांचे समाधान झाल्याचे बनसोड यांनी सांगितले. येत्या एक ते दोन महिन्यात हा प्रश्न सुटण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व या बाबत लवकरच मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी, सदरची थकबाकीची रक्कम मोठी असून, संबंधित नगरपालिका पैसे देणार नसेल तर त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना केली. या बैठकीत पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेला निधी मुदतठेव म्हणून ठेवण्याच्या विषयाला मंजुरी दिली. बैठकीस उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती अश्विनी आहेर, सदस्य महेंद्र काळे, यतीन कदम, आत्माराम कुंभार्डे, सविता पवार यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी तगादा लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 1:00 AM
ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ११ कोटी रुपये देवळा, नांदगाव नगरपालिकेकडे थकले असून, या संदर्भात वारंवार तगादा लावण्यात येऊनही नगरपालिकेकडून पैसे भरण्यास चालढकल केली जात असल्याने येत्या महिनाभरात नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन पैशांची मागणी करण्याचा अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्दे स्थायी समितीचा निर्णय : अन्यथा पाणी पुरवठा खंडित