नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यावरच टँकर्स सुरू करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्याला यंदाही टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, सद्य:स्थितीत तीन शासकीय टँकर्सने पाणीपुरवठा सुरू असताना आणखी दहा टँकर्सला मंजुरी देण्यात आली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने किमान मे महिन्यापर्यंत तरी पाणीटंचाई जाणवणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे पाणी आवर्तनाचे फेर नियोजन करण्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु उन्हाची तीव्रता जाणवू लागताच येवला तालुक्यातून टँकर्सची मागणी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात तहसीलदारांनी तीन टँकर्सची मागणी नोंदविल्यानंतर ६ गावे आणि २ वाड्यांना तीन शासकीय टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. आता आणखी १० टँकर्सची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश होऊन मंजुरीदेखील देण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांत या टँकर्सने तालुक्याला पाणीपुरवठा होणार आहे.
नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्याला वाढत्या उन्हाबरोबरच टँकर्सची गरज भासू लागली आहे. सद्य:स्थितीत तीन टँकर्सद्वारे तहान भागविली जात असून, पुढील आठवड्यात आणखी दहा टँकर्स सुरू होणार आहेत. त्यानुसार १३ टँकर्सद्वारे १७ गावे आणि २५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, टँकर्सबरोबरच एक विहीरदेखील अधिग्रहित करण्यात आली आहे. देवळा तालुक्यासाठी तीन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाणीसाठा देखील आटत असल्याने जिल्ह्यातून टँकर्सला होणारी मागणी लक्षात घेता तालुका पातळीवरच टँकर्स मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी पुरवठादारांची नियुक्ती तसेच विहिरी अधिग्रहित करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या असून, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.