सिन्नर : पाऊस लांबल्याने पाणीबाणीचे संकट गडद होत आहे. जलसंधारण विभागाने एमआयडीसीला ३१ जुलैपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने शनिवार (दि.२२) पासून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत निमाचे सिन्नरचे पदाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, स्टाईसचे अध्यक्ष व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. दारणा नदीवरील सोडण्यात आलेले आवर्तन २२ मे रोजी बंद करण्यात आले आहे. सोडलेले पाणी मान्सून लाबण्याची किंवा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेवून ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे उपअभियंता जे. सी. बोरसे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सिन्नरच्या सरदवाडी भागातील उपनगरांना याची झळ सोसावी लागणार आहे. पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी केले आहे.
एमआयडीसीकडून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 5:42 PM