नांदुरमध्यमेश्वर धरणातून बारागाविपंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर, गुळवंच, निमगाव, हिवरगाव या गावांसाठी योजना अस्तित्वात आली. सुळेवाडीला नुकतेच पाणी पोहोचले आहे. उर्वरित सहा गावांना यापूर्वीच पाणी वितरण सुरू करण्यात आले आहे. २०१८-२० या कालावधीतील ३५ लाख रुपयांचे वीज देयक जीवन प्राधिकरणने भरले. मार्चपासून योजनेचे देयक भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने महावितरणने वर्षभरात चार वेळा वीज जोडणी तोडण्याची कारवाई केली. पाच महिन्यांपासून योजना चालवण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यानंतर दोनदा काही प्रमाणात देयक भरून योजना सुरू करण्यात आली. मात्र, समाविष्ट गावांकडून पुरेशा प्रमाणात वीज देयक भरण्यासाठी तजवीज केली जात नसल्याने पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा वीज तोडण्याची कारवाई झाली आहे. योजनेचे लाख रुपये देयक अजूनही थकीत आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी योजना सुरू होण्यासाठी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्यासह महावितरण, जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसह सहा गावांतील सरपंच, ग्रामस्थ व ग्रामसेवकांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा वीज देयक थकीत असल्याने योजना ठप्प झाली. योजना सुरळीत चालण्यासाठी सहा महिन्यांत तीन वेळा बैठका झाल्या. मात्र, त्याही निष्फळ ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात समिती स्थापन करण्यात आली. पुरेशा दाबाने गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी बिलाची वसुली होण्यात अडचणी आहेत. महावितरणने मागचे देयक पूर्ण माफ करावे. पुढची देयके १०० टक्के भरू, असे आवाहन बारागावपिंप्री पाणी योजनेचे अध्यक्ष भाऊदास शिरसाट यांनी केले.