--------------------
दोडी येथे वाफेचे मशीन वाटप
नांदूरशिंगोटे : कोरोना संसर्गजन्य आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी दोडी खुर्द येथे आजी-माजी सैनिक, पोलीस, व्यापारी यांच्याकडून ४५० वाफेचे मशीन वाटप करण्यात आले. माजी सैनिक सोमनाथ भालेराव, दीपक बर्डे, माजी पोलीस अधिकारी भास्कर कांबळे, सरपंच रमेश आव्हाड, चेअरमन नवनाथ सगळे आदींच्या हस्ते ग्रामस्थांना वाफेचे मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी राजू भालेराव, अशोक गोसावी, पंडित नागरे, पप्पू आव्हाड, भारत दराडे, अशोक कांगणे, पंडित आव्हाड, नवनाथ माळी, रवि भालेराव आदी उपस्थित होते.
----------------------
कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
नांदूरशिंगोटे : वादळी वाऱ्यामुळे शेतात पडलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सध्या अनेक शेतकऱ्यांनी शेतातून काढलेला कांदा शेतामध्येच उघड्यावर वाळण्यासाठी टाकला आहे. या वाऱ्यामुळे व पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली असून, अनेक ठिकाणचा कांदा पावसामुळे भिजला आहे. काही शेतकऱ्यांचे कांदा चाळीत टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातही या वादळामुळे व्यत्यय आला. कांदा झाकण्यास कागद खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये अनेकांची गर्दी झाली. सध्या कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे.
------------------
महावितरणला फटका
नांदूरशिंगोटे : जोरदार वाऱ्यासह आलेल्या ताउते चक्रीवादळाचा महावितरणला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून, अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी बहुतांश भाग तत्काळ सुरू करण्यात आला, तर अनेक भाग सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे.
------------------
वंजारी फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप
सिन्नर : कोरोना आजाराच्या महामारीमुळे अनेकांना नोकऱ्या, धंद्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने, वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने सिन्नर तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी गरजू, गोरगरिबांना अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी विलास दराडे, ईश्वर मुत्रक, रामकृष्ण वाघ, अमोल सांगळे, प्रवीण वाघ, मंगेश दराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
खतांच्या दरवाढीने शेतकरी धास्तावला
नांदूरशिंगोटे : अलीकडच्या काळात शेणखताचा वानवा असल्याने, रासायनिक खतांच्या आधाराने शेत उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतो. जिवाची पर्वा न करता शेतकरी झिजत असतो. मात्र, डिझेल भाववाढीने यंत्रशेती व रासायनिक खतांच्या भाववाढीने तो हतबल होत असून, धास्तावला आहे.