नाशिक : जिल्ह्यात २ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठच्या गावांचा पाणी व वीजपुरवठा खंडित झाला असून, त्याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी (दि. ४) संमत करण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य रवींद्र देवरे, प्रा. अनिल पाटील, प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, कृष्णराव गुंड, गोरख बोडके आदि उपस्थित होते.रवींद्र देवरे यांनी जिल्ह्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावे. बांधकाम विभागाने झालेल्या इमारतीच्या नुकसानीचे तसेच लघुपाटबंधारे विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या गावतळे, पाझरतलाव यांचे तत्काळ पंचनामे करावे, तसा अहवाल सादर करून जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी पूरहानीतून मदतीचा प्रस्ताव पाठवावा, असा ठराव संमत केला. शैलेश सूर्यवंशी यांनी त्यात भर घालत उशिराने आलेल्या पावसामुळे आताच पेरण्या केलेल्या काही खरीप पिकांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासन आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच पुरामुळे जेथे जेथे पाणीपुरवठा योजना बंद झालेल्या आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे तो तत्काळ पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव मांडला.पूरहानीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश वीज पोल पडले असल्याचे, तसेच त्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याचे गोरख बोडके व प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विजयश्री चुंभळे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावेळी ठाकूर यांनी वीज साहित्य देखभाल दुरुस्तीसाठी १९३७ गावांपैकी १५०० गावांना प्रत्येकी साडेसहा लाखांचा असा एकूण १०२ कोटींचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
गोदाकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद
By admin | Published: August 05, 2016 2:04 AM