वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील मोरांचा अधिवास असलेल्या लोधाई माता टेकडी येथे मोरांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाणी टाकण्यात आले. त्यामुळे मोरांच्या अन्न - पाण्याचा प्रश्न काहीअंशी सोडवण्यास मदत झाली.चांदवड तालुक्याच्या गणूर आणि वडनेर भैरव या गावांमध्ये हरणे, मोर या पशुपक्ष्यांसाठी ही दोन्ही गावे ओळखली जातात. या गावात दोन्हींचाही अधिवास आहे. यामुळे या गावांना पर्यटनासाठी वेगळी ओळख मिळत आहे.अनेक मोर व हरीण हे पाण्याच्या शोधासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या वस्तीकडे येतात. ही बाब नाशिक वन विभाग अधिकारी सुरज नेवसे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या पशुपक्ष्यांसाठी पाण्याची कृत्रिम तळी म्हणजेच पाणवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशान्वये चांदवड वन विभाग अधिकारी पवार, वडनेर भैरव वन परिक्षेत्राधिकारी नानासाहेब चौधरी यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने उखळी आणि लोढाई माता मंदिर परिसरात कृत्रिम पाणवठे बनविले.वन समितीने सलादे बाबा कला कला मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे यांना द्राक्ष बागेसाठी फवारणी करणाऱ्या ब्लोअरच्या माध्यमात नाव या तळ्यामध्ये पाणी टाकण्याची विनंती केली. त्यांचे चिरंजीव अविनाश पाटोळे यांनी ट्रॅक्टरच्या व ब्लोअरच्या साह्याने मोरांसाठी पाणी उपलब्ध करून ते टाकण्याची व्यवस्था केली. वडनेर भैरव संयुक्त वन समितीच्यावतीने अध्यक्ष रामकृष्ण पवार, उपाध्यक्ष दत्तात्रेय निखाडे कोषाध्यक्ष दत्त शिंदे यांच्यासह अनेकांनी वन खात्याचे व मनोहर पाटोळे यांचे आभार मानले.नाशिक जिल्हा वन खाते अधिकारी नेवसे, तालुका वन अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग पर्यटनसाठी प्रयत्न करणार असल्याचे संयुक्त वन समितीने सांगितले. लवकरच ग्रामस्थ आणि अधिकारी यांची पुढील नियोजनासाठी संयुक्त बैठक लावण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने या निसर्ग पर्यटन केंद्राचा विकास आराखडा तयार करण्यात येईल.---------------------गावचे श्रद्धास्थान असलेल्या लोढाई माता परिसरातील मोरांसाठी वन खात्याने राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. त्या पाणवठ्यांसाठी व माझ्यासह अनेक शेतकरी स्वखर्चाने त्यात पाणी भरण्यासाठी पुढे येऊ. मोर हे आमच्या परिसराचे वैभव बनवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.-अविनाश मनोहर पाटोळे, वडनेर
शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोरांसाठी पाणवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:17 PM