देवळा : गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात देवळा शहरासह नऊ गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. नदीपात्रात असलेल्या उद्भव विहिरीतून देवळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीला पाणी असेल तर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहतो. परंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यानंतर शहराचा पाणी पुरवठा अनियमित होतो. यामुळे शहरवासीयांना गिरणा नदीला चणकापूर / पुनंद धरणातून पुढील आवर्तन येईपर्यंत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा अनियमित सुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच कोरोनामुळे शहरातून विद्यार्थी, तसेच चाकरमाने गावाकडे परतल्यामुळे शहरातील अनेक कुटुंबात सदस्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. त्यातच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाण्याने हात स्वच्छ धुणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी शासनाने विविध सुचनांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे . परंतु अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे इतर ठिकाणाहून पाणी आणणे दुरापास्त झाले आहे.
देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 4:27 PM
गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .
ठळक मुद्देशहरात पाणीटंचाई : गिरणा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी