नाशिक : गंगापूर, दारणा आणि आता मुकणे अशा तीन धरणांतून पाच हजार दशलक्षघनफूट असलेल्या नाशिक शहराला आता टॅँकरची गरज भासू लागली असून अनेक प्रभागांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच आता आगामी वर्षासाठी महापालिकेने सर्वच प्रभागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या असल्याने नाशिकच्या पाणीपुरवठ्याला नक्की झालय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सुमारे तीस लाख रुपयांच्या या निविदांमध्ये पाणी मात्र नाशिक महापालिकेला द्यावे लागणार असून, प्रति फेरी सुमारे सहाशे रुपये मनपा देणार आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे महापालिकेला किमान चारशे फेऱ्या सशुल्क कराव्या लागत असून, त्या पार्श्वभूमीवर आता टॅँकरची गरज भासू लागली आहे.दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मात्र केवळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर त्याची आगाऊ तरतूद म्हणून टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर मागवून ठेवले असून, गरज भासल्यासच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले.पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नाशिक हे सर्वांत सुखी शहर मानले जाते. गंगापूर धरण समूहातून महापालिकेला पाणी आरक्षण मिळते. परंतु त्याच बरोबर मुकणे धरणातून तीनशे दशलक्षघनफूट इतके आरक्षण मिळते. महापालिकेच्या पाणी वापराविषयी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दरवेळी चर्चा होत असते आणि काटकसरीचा सल्ला दिला जात असतो. तरीही महापालिकेने २००८ मध्येच किकवी धरणातून पाणी मिळवण्याची जलसंपदा विभागाकडून हमी घेऊन भविष्यकालीन पाण्याची तरतूद करण्यात आली होती.सिंचन घोटाळ्यामुळे किकवीचा विषय मागे पडल्याने महापालिकेने मुकणे धरणातून तीनशे दशलक्षघनफूट आरक्षण मिळवले आहे. आता शहरासाठी मुबलक पाणी असल्यानेभविष्यात टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी दिवसाआड पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, सध्या उपनगर आणि इंदिरानगर परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन आता आगामी वर्षासाठी महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत.दिवसाला दोन फेºया..पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेला पावसाळा वगळता आणि हिवाळा आणि उन्हाळ्यातील सुमारे दोनशे दिवसांसाठी या निविदा काढाव्या लागात. त्यातच प्रशासनानेच दिलेल्या माहितीनुसार सरासरी चारशे टॅँकरद्वारे फेºया होत असल्याने दिवसाकाठी दोन फेºया होतात असे स्पष्ट होते. दिवसाला दोन टॅँकर लागत असेल तर पालिकेकडे मुबलक पाणी असूनही पाणीपुरवठा कसा होतो हे स्पष्ट होते.महापालिकेने टॅँकरसाठी निविदा मागविताना प्रत्येक विभागातील प्रभागाचा उल्लेख केल्याने महापालिका प्रत्येक प्रभागात टॅँकरने पाणीपुरवठा करणार आहे? असा प्रश्न पडला आहे. तथापि, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वतीने दरवर्षीच अशाप्रकारे टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी दर मागविले जातात आणि पाणीपुरवठा कोठे विस्कळीत झाला की, त्याचा वापर केला जातो. नियमितपणे कुठेही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ही निविदा नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी केला आहे.
शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:55 AM