नाशिक : वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे. पाणीपुरवठा विभागाने गलथान कारभाराचा कळस गाठला असून आठवडाभरापासून नागरिकांच्या घरात नळांवाटे पिवळसर पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळागाव परिसरात अद्यापही काही भागांमध्ये सांधेदुखी, थंडी-ताप, विषमज्वरसारख्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत वडाळागावात पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा होणे अपेक्षित असताना अधूनमधून नळांना पाणी गढूळ, पिवळसर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडाळागावात शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वडाळागाव परिसरातील नागरिकांना पोटदूखी, जुलाब, अतिसारसारख्या शारीरिक तक्रारींचाही सामना करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस वडाळागाव परिसरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वारंवार मागणी करूनदेखील वडाळागावात नियमित स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वडाळागावातील गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यास पाणीपुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन दिवसांआड वडाळागावात अशुद्ध पाणी नळांना येत असल्याचे महिलांनी सांगितले. ही समस्या गावातील एका विशिष्ट परिसराची नसून संपूर्ण गावात पिवळसर पाणी येऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन वडाळागावात शुद्ध स्वरुपाचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांना अंतर्गत गळतीचा संशयवडाळागाव परिसरातील जलवाहिन्या जुनाट झाल्या असून, या जलवाहिन्यांपैकी काही जलवाहिन्यांना अंतर्गत गळती लागली असल्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे जलवाहिन्या ‘वॉश आउट’ करून तपासणी करण्याची गरज आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करण्याबाबतची यंत्रणाही तपासण्याची आवश्यकता आहे.बोधलेनगरलाही समस्याअशोकामार्ग, बोधलेनगर, कल्पतरूनगर, फातेमानगर, खोडेनगर, अंजुम पार्क, हॅप्पीहोम कॉलनी, गणेशबाबानगर या भागांमध्येही मागील तीन ते चार दिवसांपासून मातीमिश्रित गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक २९ व ३०मध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून या भागातील नागरिकांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:13 AM