प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव, मंगला आढाव, सुमन सातभाई यांनी जलकुंभासाठी प्रयत्न केले होते. या भूमिपूजनावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, हेमंत गायकवाड, सुधाकर जाधव, गणेश गडाख, कुलदीप आढाव, दिनेश कनोजिया आदी उपस्थित होते.
(फोटो १७ नाशिकरोड)
आडगाव नाका-द्वारका रस्त्याची दुरवस्था
नाशिक : जुना आडगाव नाका ते द्वारकादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता पूर्णपणे निसरडा झाला आहे. यामुळे अनेकवेळा दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दुचाकीस्वारांना उड्डाण पुलावरून जाण्यास बंदी असल्यामुळे त्यांना येथून जावे लागते
पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
नाशिक : मागील तीन आठवड्यांपासून थांबलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पिके वाळू लागली होती. आता या पावसाने त्यांना थाडेफार तरी जीवदान मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी खते टाकली होती त्यांचा खर्च आता वाया जाणार नाही. मात्र केवळ एका पावसावर पिके येतील असे नाही. यामुळे शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अश्वमेधनगरला लसीकरण सुरू
पंचवटी : पेठरोड आरटीओ परिसरात असलेल्या अश्वमेधनगर मनपा शाळा क्रमांक १६ येथील उपकेंद्रावर कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक पुंडलिक खोडे, पंचवटी वैद्यकीय अधिकारी विजय देवकर, भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, महेश शेळके, राजा नाईकवाडे, संतोष लाहुडकर, भरत पवार, दीपक धोत्रे, हरिभाऊ काळे, स्वप्निल ओढाणे, दिलीप अहिरे उपस्थित होते. परिसरात लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना अन्य लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जावे लागत होते.
रामकुंडातील शेवाळ काढण्याची मागणी
नाशिक : रामकुंडात शेवाळ वाढल्याने या ठिकाणी येणारे अनेक भाविक पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने रामकुंडाची स्वच्छता करून शेवाळ काढावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रामकुंडावर दररोज अनेक भाविक दशक्रिया विधीसाठी येत असतात. ज्यांना तेथील शेवाळाची माहिती नसते, त्यांचा अचानक तोल जाण्याच्या घटना घडत आहेत.
शाही मिरवणूक मार्गावर झोपड्या
नाशिक : मागील सिंहस्थात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या शाही मिरवणूक मार्गावर गंगेवरील काही भिकाऱ्यांनी झोपड्या थाटल्या असल्याचे दृश्य दिसून येत आहे. या झोपड्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी या प्रकाराला वेळीच आळा घालावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.