महापालिकेची महासभा सोमवारी (दि.७) पार पडली. यात या विषयांना मंजुरी देण्यात आली. हे जलकुंभ मंजूर करण्याचे प्रस्ताव या आधी महासभेवर मंजूर होते. मात्र, चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जलदाय व्यवस्था आणि काही कामे कुंभमेळ्यात करण्यात आली. त्याचा वाढीव खर्च हा मूळ प्राकलनाच्या दहा टक्के अधिक असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. त्यावरून बरीच भवती न भवती झाली. त्यामुळे आता शहाणपण आलेल्या प्रशासनाने सर्व विषय स्थायी समितीत मंजूर असताना केवळ १० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च असल्याने ते महासभेच्या पटलावर मांडले. परंतु त्यासाठी मूळ विषय पत्रिकेवर विषय येण्याची प्रतीक्षा न करता ऐनवेळी हे विषय मांडून त्यास मान्यता देण्यात आली.
नाशिकरोडला पाणीपुरवठा करणाऱ्या चेहेडी बंधाऱ्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस मलयुक्त पाणी येत असल्याने अडचण निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून म्हणजे गंगापूर धरणातून सक्षमतेने या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिकरोड येथे बैठक घेतली हेाती. त्यात ठरल्यानसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीनगर आणि तेथून नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १९ कोटी रुपये खर्चांची नवी जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यास मंजुरी देण्यात आली.
इन्फो....
हे आहेत प्रस्तावित जलकुंभ
* सातपूर विभागातील मोगलनगर- (१७ टक्के ज्यादा दर)- ४ कोटी ६ लाख रुपये.
* सिडको प्रभाग क्रमांक २८ स्वामीनगर (१८.८७ टक्के ज्यादा)- २ कोटी ९७ लाख
* सिडको विभाग पेलिकन पार्क (१७.९० टक्के) २ कोटी ९४ लाख
* सातपूर विभागात बळवंतनगर (१८.८५ टक्के) ३ कोटी ८४ लाख
* नाशिक पश्चिम विभागात महात्मानगर (१९.३५ टक्के) ९ कोटी ४४ लाख
* सिडको विभागात कर्मयोगीनगर (१७ टक्के) ४ कोटी रुपये
* सातपूर विभागात आशीर्वादनगर (१८.८५ टक्के) ५ कोटी ३४ लाख
* सातपूर विभागीय कार्यालयामागे (१३.८६ टक्के) २ कोटी १८ लाख
* नाशिकरोड विभागात वडनेर दुमाला (१८.५१ टक्के) २ कोटी ५३ लाख
* नाशिकरोड विभागात शिवशक्ती नगर (१३.८६ टक्के) २ कोटी ५७ लाख
* पंचवटी विभागात हिरावाडी (१५.७३ टक्के ज्यादा) ५ कोटी १६ लाख
* नाशिकरोड येथील चंपानगर (१७ टक्के) ४ कोटी ८ लाख रुपये
* पंचवटी विभागात हनुमाननगर (१७.६४ टक्के) ५ कोटी २७ लाख