निफाड : तालुक्यातील पूरग्रस्त चांदोरी, सायखेड्यात रविवारी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.चांदोरी येथे सुमारे ९ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. नाशिक येथील जियो ग्रुप, पिंपळगाव बसवंत येथील समर्थन ग्रुप, चांदोरी ग्रामपंचायत स्थानिक नागरिक यांच्या वतीने ९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. चांदोरी येथे रोगराई पसरू नये यासाठी ३५ जणांच्या पथकाने मलेरिया प्रतिबंधात्मक फवारणी केली. तसेच बी एच सी पावडर ची डस्टरने फवारणी केली. चांदोरी ग्रामपंचायतीने साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. चांदोरी ग्रा.प.च्या वतीने चांदोरी येथील निवाऱ्यात थांबलेल्या पूरग्रस्त नागरिकांना सकाळी जेवण तर संध्याकाळी नाशिकच्या जियो ग्रुपच्या वतीने जेवण देण्यात आले. सायखेडा येथे ग्रा.पं च्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व सफाई कामगारांनी अतिशय मेहनत घेऊन सफाईचे काम केले व प्रचंड कचरा गोळा करून ट्रॅक्टर द्वारे वाहून नेला. निफाड नगरपंचायतीने या गावात नगरपंचायतीचे टॅँकर पाठवून पिण्याचे पाणी सुद्धा पुरवले तर नगरपंचायतच्या वतीने सायखेडा येथे दोन वेळेस तर चांदोरी येथे एक वेळेस मलेरिया प्रतिबंधात्मक फवारणी केली. निफाड येथील मातोश्री जसोदा बाई सोनी सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने चांदोरी, सायखेडा या गावात सलग ४ दिवस खिचडी वाटप करण्यात आले. या ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी याकामी पुढाकार घेतला होता. (वार्ताहर)
चांदोरी-सायखेड्यात टँकरने पाणी
By admin | Published: August 08, 2016 12:10 AM