इंदिरानगर : भारतनगर परिसरात अनधिकृत नळजोडणी आणि विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याची स्पर्धा केव्हा थांबणार? महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोटारी जप्ती मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी भारतनगर येथील शिवाजीवाडी, नंदिनीनगर आदी परिसरात बोटावर मोजण्याइतकीच घरे होती. परंतु परिसरात दिवसागणिक झोपड्या आणि घरे वाढत चालली आहेत. त्यातच भारतनगर येथील सुमारे सहा एकर जागेत अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या लोकवस्तीत नवनवीन समस्या उद्भवत आहेत. यामध्ये अनधिकृत नळ जोडणी आणि जलवाहिनी सर्रासपणे विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचणे गंभीर समस्या बनली आहे. परिसरात सुमारे तीनशे ते साडेतीनशे अनधिकृत नळ जोडणी असून, त्यातच जलवाहिनी विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचणे सुरू असल्याने महापालिकेस पाणीपट्टीद्वारे मिळणारा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे. तरीही अद्यापर्यंत महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नळाला जोडल्या मोटारीपरिसरात जलवाहिनी तोडून त्यास विद्युत मोटार जोडून नळीद्वारे सर्रास पाण्याची चोरी केली जात आहे. पाणीपुरवठा विभाग अनधिकृत नळ जोडणी आणि विद्युत मोटार जप्ती मोहीम का राबवित नाही, असा प्रश्न केला जात आहे. तसेच नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भारतनगर भागात पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:14 PM