पंचवटी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पारंपरिम मापदंड मानल्या जाणाऱ्या गोदावरील पात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्यावर पुराचे पाणी आल्याने नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
गंगापूर धरणातून रविवारपासून विसर्ग केला जात असल्याने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारच्या दिवशी दुपारी गंगाघाटावरील दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेच्यावर पुराचे पाणी लागले होते. पावसाचा जोर कायम राहिला तर रात्रीतून गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, गंगाघाटावर नदीकाठलगत परिसरात विविध व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांच्या टपऱ्या पाण्याखाली सापडल्याने त्या सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले होते.
गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे समजताच नागरिकांनी गंगाघाटावर पुराचे पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती. परिसरातील नाले, गटार तुडुंब भरल्याने नाले चोकअप झाल्याने सांडपाणी पाण्यात मिसळत होते. दरम्यान, पुरामुळे दशक्रिया विधी अन्य धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी आलेल्या
नागरिकांना काठावरच धार्मिक विधी करावे लागले.