नाशिकरोड : शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने नागरिक बेजबाबदार झाल्याचेही दिसत आहे. उनपगर परिसरात अनेक नागरिक हे रस्त्यावर वाहने धुवत असल्याने तसेच पाण्याचा पाइप तसाच सोडून देत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. सकाळ आणि सायंकाळी अनेक लोक आपल्या घराबाहेर पाण्याचा सडा मारत आहेत. अशा नागरिकांना समज देण्याची मागणी होत आहे.
बोधलेनगर कॉलनी रस्त्याची दुर्दशा
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील बोधलेनगरमधील आंबेडकरवाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून, अर्धवट बुजविण्यात आल्यामुळे रस्ता नादुरुस्त झाला आहे. रस्त्याच्या कडेलादेखील अनेक ठिकाणी रस्ता मातीने बुजविलेला असल्याने रस्त्याची दुर्दशा झाल्याचे दिसते.
सोमवार बाजार पुन्हा बहरला
नाशिकरोड : लॉकडाऊनच्या नियमावलीत अडकलेला सोमवारबाजार पुन्हा एकदा बहरला आहे. बाजार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर बाजारातील चैतन्य परतले आहे. विशेषत: आठवडे बाजारावर गावाचे अर्थकारण अवलंबून असल्याने आठवडे बाजार सुरू होण्याची गावकऱ्यांना प्रतीक्षा होती. नाशिकरोड परिसरातील अनेक खेडे गावांचा व्यवहार आठवडे बाजारावर अवलंबून आहे.
जयभवानी मार्गावर वर्दळ वाढली
नाशिक: आर्टिलरी सेंटर रोड ते उपनगर चौक मार्गाला जोडणाऱ्या जयभवानी मार्गावरील वर्दळ वाढली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहत तसेच कॉलनी, सोसायटी तसेच बंगले असल्याने या मार्गावर सातत्याने वर्दळ असते. या मार्गावर भरणारा बाजार तसेच पेट्रोल पंपदेखील असल्याने वाहनांचीही गर्दी असते.