ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5 - वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची कास नागरिकांनी धरावी, भावी पिढीला वृक्षसंगोपनाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने पर्यावरण दिनाच्या औचित्यावर आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने ‘नाशिक देवराई’ येथे बारा हजार रोपट्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुन्हा एकदा नाशिककरांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांची भेट घेत त्यांना आणलेले पाणी ‘गिफ्ट’ केले. यावेळी देवराईवरील झाडांना फुगे लावण्यात आले होते. रोपट्यांभोवती झेेंडु फुलाच्या पाकळ्यांची सजावट व रांगोळी काढण्यात आली होती.
देवराईवरील १०४ प्रजातीच्या पर्यावरणपूरक अशा रोपट्यांची माहिती, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योग्य वृक्षप्रजातीच्या निवडीचे महत्त्व, वृक्ष दत्तक योजना आदिंविषयीच्या प्रबोधनपर माहितीफलक उभारण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांपासून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह, महिला मंडळ, विविध संस्था, युवक मित्रमंडळांच्या कार्यकर्त्यांनी येऊन येथील झाडांना पाणी दिले. यावेळी बहुतांश मंडळांनी ‘वीकेण्ड’ला श्रमदानासाठी येण्याचा संकल्पही देवराईवर सोडला. तसेच या पावसाळ्यात वृक्षारोपण व संवर्धनाची शपथही विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी येथील वृक्षराजीच्या साक्षीने घेतली.
प्रारंभी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी,आमदार देवयानी फरांदे, उपवनसंरक्षक टी.बियुला मती, नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, आपलं पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र शेखर गायकवाड सर्व स्वयंसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.--
सुवासिनींकडून रोपट्यांचे औक्षण-आपलं पर्यावरण संस्थेच्या सदस्य असलेल्या सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. यावेळी वृृक्षपूजा करण्यात आली. उपस्थित सर्वांनी वृक्ष संवर्धनातून वसुंधरेच्या संरक्षणाची शपथ घेतली.