नाशिक/त्र्यंबकेश्वर : शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार, पर्यावरण, वातावरणीय बदल व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी शेंद्रीपाडा येथे केले.
त्र्यंबकेश्वर येथील दुर्गम भागात लोकसहभागातून साकारलेल्या सावरपाडा व शेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पाहणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावीत, काशीनाथ मेंगाळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इगतपुरी-त्र्यंबक उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता, प्रादेशिक व्यवस्थापक महेश बागुल, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शेंद्रीपाडाचे सरपंच विठ्ठल दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आज प्रसारमाध्यम संस्थांकडून या भागातील समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या भागात पाऊस जास्त पडतो, परंतु पाणी साठवणीसाठी योग्य उपाययोजना नसल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. आज प्रत्यक्ष भेटीतून या भागातील लोकांच्या समस्या जास्त जवळून जाणून घेता आल्या आहेत. या आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दुर्गम भागात डोक्यावर हंडी घेऊन पायपीट करावी लागते. जलजीवन योजनेच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यात या वाड्या-पाड्यातील प्रत्येक घराच्या दारापर्यंत आपण पिण्याचे पाणी पोहोवणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. शेतीला प्राधान्य देऊन आदिवासी वाड्या- पाड्यात रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या भागात पर्यटन विकासाच्या दृष्टिने प्रयत्न करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या माध्यमातून विकास साधणार : भुसे
दीड वर्षापूर्वी याच भागातील साप्ते कोने या आदिवासी पाड्यातून कृषिदिन सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. आदिवासी भागाच्या
विकासासाठी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.