नाशिक (सुयोग जोशी) : स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या सोहळ्या अगोदर पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला. त्यानंतर त्यांनी रामकुंडावर जलपूजन केले त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन केले. त्यानंतर ते युवा महोत्सवाच्या उदघाटनाला आले असून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. १२ ते १६ जानेवारी पर्यंत हा सोहळा असून आज सकाळपासून युवा कला महोत्सव सुरु झाला आहे.
युवा महोत्सवाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू असून मोदी यांच्याकडून युवकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला जात आहे. नाशिकच्या ढोल पथकाचे सादरीकरण. पारंपरिक वेषभूषेत हरियाणाच्या युवकांचा जल्लोष. सभागृह युवकांच्या सादरीकरणाने दणाणले. हरियाणानंतर मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तेलंगण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचे लेझिम पथकाकडून सादरीकरण करण्यात आले. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी चमकदार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
तत्पूर्वी, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागत केले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.