लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : पावसाळा लांबल्याने खामखेडा परिसरातील मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला असून, मेंढ्यांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पावसाला दरवर्षी दि. २५ मे नंतर सुरुवात होत. साधारण मृग नक्षत्रापर्यंत येण्यास सुरुवात होते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सर्वत्र गवत उगवून परिसर हिरवागार दिसतो. त्यामुळे मेंढ्यांचा चाऱ्याचा प्रश्न या दिवसांमध्ये सुटलेला असतो.परंतु चालू वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्र लागून तीन-चार दिवस होत झाले तरी कोठेही पावसाची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने जिल्ह्यात काही अल्पशा प्रमाणात हजेरी लावली आहे. परंतु खामखेडा परिसरात अजूनही पाऊस न पडल्याने मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध न झाल्यामुळे मेंढपाळांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन चारा म्हणून त्यांचा उपयोग करावा लागत आहे. पूर्वी शेतात गावठी बाभळाची, निंबाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उन्हाळ्यात या झाडांच्या पाल्यावर भागत असे. परंतु आता शेतातील झाडांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडाच्या पाल्यावर मेंढ्यांची भूक भागवावी लागत आहे.काही मेंढपाळ तर ज्या शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो विकत घेऊन त्याच्या शेतात रात्रभर मेंढ्या फुकट बसवतात. त्यामुळे मेंढ्यांचा पाण्याचा व बरोबरच चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. यामुळे मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे.
पाण्याअभावी मेंढपाळांचे हाल
By admin | Published: June 19, 2017 1:10 AM