विंचूर : सोळागाव समितीसह ग्रामपालिकेने घेतली दखलविंचूर : येथील सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या गळती दुरुस्तीस अखेर मुहूर्त लागला असून, लक्ष्मी मार्केटसमोरील व्हॉल्व्हजवळ गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. उकीरड्याजवळील गळती बंद झाल्याने स्वच्छ पाणीपुरवठा होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.लासलगावसह विंचूरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला येथील लक्ष्मी मार्केटसमोरील भागात गळती लागली होती. व्हॉल्व्हजवळ असलेल्या उकीरड्यामुळे गळतीच्या ठिकाणी मोठे पाण्याचे डबके साचले. ‘लोकमत’मध्ये सोमवारी (दि. १७) ‘नागरिकांचे आरोग्य धोक्यात’ या मथळ्यााखाली बातमी प्रसिद्ध होताच त्याची तत्काळ दखल घेण्यात आली.आज सकाळी ग्रामविकास अधिकारी जी.टी. खैरनार यांसह ग्रामपालिका सदस्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन त्याबाबत उपाययोजनेच्या सूचना केल्या. तसेच दुपारपर्यंत गळती काढण्यात येऊन सदर व्हॉल्व्हजवळील जागा स्वच्छ करण्यात आली. सदर पाणीपुरवठा योजना तसेच जलवाहिनी सोळागाव समितीच्या देखभालीखाली आहे. सदर जलवाहिनीस वेगवेगळ्या भागात कायम गळती लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. ग्रामपंचायतीकडून सोळागाव समितीस याबाबत माहिती देऊन तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायतीस नाहक नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामपालिकेचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
जलवाहिनी दुरुस्तीस मुहूर्त!
By admin | Published: October 17, 2016 11:11 PM