चांदोरी : येथील गोदावरीनदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे.चांदोरी - सायखेडा जुन्या पुलालगत पाणवेलीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झालेली असून, नदीपात्रात पसरण्यास सुरुवात झाली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्या काढाव्यात. जेणेकरून आणखी वाढून संपूर्ण पात्रात पसरणार नाही. मागील वर्षी या पाणवेली नांदूरमधमेश्वर ते माडसांगवी या तीस किलोमीटरपर्यंत ठिकठिकाणी पसरल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या पाणवेली चांदोरी - सायखेडा पुलाला अडकून दूरपर्यंत पसरत गेल्या होत्या. यामुळे आॅगस्ट २०१९मध्ये आलेल्या महापुराने पाण्याला अडथळा निर्माण होऊन नदीकाठी शेतात पाणी शिरले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाढत्या प्रदूषणामुळे पाणवेलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या पाणवेलींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे दूषितीकरण होत आहे तसेच मासे व जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. या पाणवेली सडल्याने दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने विविध रोगराई निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदोरी परिसरात गोदापात्रात असलेली हेमाडपंती मंदिरे व खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी पर्यटक येत असतात. ते दुर्गंधीमुळे नाराज आहेत. जलसंपदा व पाटबंधारे विभागाने या पाणवेली लवकर काढाव्यात, अशी मागणी होत आहे. जलसंपदा विभाग या पाणवेली काढण्यास दरवर्षी पैसे खर्च करते; परंतु ही पाणवेलीची समस्या त्यांनी कायमस्वरूपी कशी थांबवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गोदावरी नदीत पाणवेली वाढत असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.- बाळू आंबेकर, मासेमार
गोदावरी प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाणवेलींची वाढ सतत होत आहे. गोदामाईच्या प्रदूषणाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यावे व लवकरात लवकर गोदापात्र पाणवेली मुक्त करावे.- राजेंद्र टर्ले, ग्रामस्थ