नाशिक: पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली असून चिनी वस्तूंऐवजी ग्राहकांकडून स्वदेशी वस्तूंना मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. नाशकात यंदा पावसाचे दणक्यात आगमन झाल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या संकाटामुळे बाजारपेठेवर गेल्या काही दिवसांपासून निर्बंध असल्याने अनेक नाशिकरांनी पावसाळ्यात लागणाऱ्या छत्री, रेनकोटसारख्या वस्तूंची खरेदी केलेली नव्हती. मात्र आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने आता सुरू झाली असून, नोकरदार आणि सर्वच वर्गाकडून छत्री आणि रेनकोटच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. काही दुकानदारांनी करोना काळातील दुकाने बंद असल्याचा फायदा घेत दरात वाढ केली आहे. छत्री अथवा रेनकोटवर छापलेली किंमत नसते. त्यावर केवळ किमतीचे स्टिकर लावण्यात येते. अनेक दुकानदारांनी झालेला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवत आहेत. मार्केटमध्ये प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टिकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या छत्र्यांचा साठा आलेला आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने नवीन प्रकारच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. परंतु, यातील चीन उत्पादनांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, ग्राहकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अनेक भारतीय नागरिक चिनी वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे चीनला आर्थिकबळ मिळत आहे. परंतु चीनकडून या बळाचा वापर भारताविरोधात होणार असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
‘ड्रॅगन’विरोधात संतापाची लाट : चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 9:25 PM
पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली आहे.
ठळक मुद्देचीन विरोधात नाशिककरांमध्ये संतापाची लाटचिनी उत्पादनांवर ग्राहकांचाही बहिष्कार