नाशिक : तीस वर्षे मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेला यंदा देवळाली मतदारसंघाची वाट बिकट दिसू लागली असून, मतदार आम्हाला ओळखतात त्यामुळे प्रचाराची गरज काय अशा आविर्भावात विद्यमान आमदार योगेश घोलप यांची वाटचाल सुरू असल्याने त्याचा नेमका फायदा विरोधी इच्छुकांनी उचलण्याची रणनीती केली आहे. गावागावांत समाजमंदिरे बांधली म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला काय, असा प्रश्न मतदार विचारत असल्याने यंदा घोलप यांची वाट बिकट बनण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव बालेकिल्ला सलग ३० वर्षे आपल्या ताब्यात राखण्यास माजी आमदार बबन घोलप आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. गेल्या निवडणुकीत सेनेविषयी प्रतिकूल परिस्थिती असतानाही निव्वळ बबन घोलप यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याच्या सहानुभूतीमुळे योगेश घोलप काठावर तरले. मात्र पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. बबनराव घोलप यांचा मतदारांशी तुटलेला संपर्क व योगेश घोलप यांचे मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष पाहता, सेनेच्या या बालेकिल्ल्यात विरोधकांनी चांगलीच जमवाजमव करून ठेवली आहे.३० वर्षेे मतदारसंघ ताब्यात असूनही मतदारसंघाचा विकास झाला नाही तसेच एखादा प्रकल्प वा मोठी गुंतवणूक योगेश घोलप आणू शकले नाहीत, शिवाय एकलहरे वीज प्रकल्प अखेरचा घटका मोजत असताना याप्रश्नी त्यांनी बाळगलेले सोईस्कर मौन मतदारांमध्ये नाराजी निर्माण करणारी आहे. फक्त समाजमंदिरे बांधण्यात अग्रेसर असलेल्या घोलप यांनी मूलभूत सुविधांपासून मतदारांना वंचित ठेवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघातील राजकीय व सामाजिक समीकरणांचा विचार करता घोलप यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घट होत असून, सन २००९च्या निवडणुकीत भाजपसोबत युती असतानाही बबन घोलप यांचा फक्त दहा हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला होता. सन २०१४च्या निवडणुकीत योगेश घोलप यांच्या मताधिक्क्यात वाढ दिसत असली तरी, त्यांच्या विजयामागे लोकप्रियता नव्हे तर बबन घोलप यांच्या प्रति असलेली सहानुभूतीची लाट राहून विरोधी पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे मतविभाजनाचा फायदा मिळाला आहे. मात्र सर्व विरोधकांच्या मतांची एकत्रित बेरीज केल्यास घोलप यांच्या मतांच्या टक्केवारीत घट झाल्याचेच दिसून येते.
घोलप यांच्या मतदारसंघात यंदा परिवर्तनाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:40 AM