--------------------
लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी
सिन्नर: तालुक्यात १० ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येत असले तरी लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे. मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी असल्याने यंत्रणेवर काही प्रमाणात ताण येत आहे. सिन्नर शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. प्रशासन या आपत्तीचा सामना करीत असले तरी नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. यंत्रणेत योग्य समन्वय राखून कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्यासह लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
----------------------------
प्रवासी घटल्याने बसफेऱ्या झाल्या कमी
सिन्नर : शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या घटल्याने सिन्नर आगाराने बस फेऱ्या कमी केल्या आहेत. शासनाने १५ दिवस संचारबंदी जाहीर केल्याने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे लालपरीला प्रवासी मिळणे अवघड होऊन बसले आहे. प्रवासीसंख्या घटल्याने प्रवासी मिळाल्यानंतर बस सोडण्यात येत आहे.
--------------------
बाधितांवर उपचार करतांना आरोग्य यंत्रणेची दमछाक
सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले आहेत. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर आरोग्य यंत्रणेकडून उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने बाधितांवर उपचार करतांना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
------------------------
सिन्नरला वादळी पावसाने दाणादाण
सिन्नर : शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचीच दाणादाण उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरचे पत्रे उडाले. शहरातील वावीवेस भागात लावण्यात आलेले अनेक बॅनर वादळामुळे उडाले. दिवसभर वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वादळासोबत पावसाच्या सरी कोसळल्या. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा व सोंगणी केलेल्या पिकांची झाकणी करतांना धावपळ उडाली.