कोरोना संसर्ग वाढण्याच्या यादीत नाशिक जिल्हा देशात अव्वल आला आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात व विशेषत: सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समितीमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांकडून विनंतीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी आता खंबीर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी कोरोना संसर्ग पसरविण्यास मदत करणारे, विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. सहायक निरीक्षक सागर कोते यांनी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष टास्क फोर्स बनवून कारवाईस प्रारंभ केला आहे.
गेल्या महिन्यात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सुमारे २८० केसेस दाखल केल्या असून सुमारे ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणे तसेच मुंबई पोलीस कायदा याअंतर्गत १५ केसेस दाखल केल्या आहेत. संचारबंदी लागू असताना विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या २५ जणांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वावी पोलिसांनी महसूल विभागासोबत संयुक्त कारवाई करीत तीन हॉटेलवर धाडी टाकून सुमारे ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे व शिर्डी या दोन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश होतो. या दोन्ही महामार्गांवर दिवसा व रात्री नाकाबंदी करून विनाकारण संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप लावला जात आहे. वाहनांची तपासणी करून शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त क्षमतेने वाहतूक होत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यू व अत्यावश्यक सेवावगळता अन्य दुकाने बंद असताना काहींकडून दारूविक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सहायक निरीक्षक कोते यांनी कर्मचाऱ्यांसह धाडी टाकून दारूबंदीचे गुन्हे दाखल केले आहेत. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४४ गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी करताना दोन अधिकारी व ३१ कर्मचाऱ्यांच्या कमी असलेल्या मनुष्यबळाची चर्चा न करता देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी वावी पोलिसांनी कंबर कसली असल्याचे चित्र आहे.
कोट...
लोकांना अनेकदा विनंती करून व सांगूनही न ऐकणाऱ्यांवर तसेच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा. नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. अवैध व्यवसाय सुरू असल्यास वावी पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. देश व राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.
- सागर कोते, सहायक पोलीस निरीक्षक, वावी
फोटो ओळी- १८वावी१
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करताना वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते व कर्मचारी.
===Photopath===
180421\18nsk_6_18042021_13.jpg
===Caption===
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करतांना वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व कर्मचारी.