सिन्नर : तालुक्यातील कोनांबे गावात आरोग्य विभागाने सातत्याने घेतलेले आरोग्य तपासणी शिबिर, कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट, जनजागृती, लसीकरण, औषध वाटपामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली. त्यामुळे कोनांबे गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे.
ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी केलेली जंतुनाशक औषधांची फवारणी, योग्य निर्णय, जनजागृती यामुळे गावातील आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. गावातील सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांनी लॉकडाऊन काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे गावात आज कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरणही निवळले असून, ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. लवकरच सर्व परिस्थितीमधून बाहेर पडू आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत चालू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा सिन्नर नोड अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. श्रीकांत शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड, कोनांबे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका वंदना तळपे, अलका उबाळे, आरोग्य सेवक महेंद्र सूर्यवंशी, आशा सेविका डावरे, भागवत, गवारे, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील आदींच्या परिश्रमामुळे कोरोनापासून गावाची मुक्ततेकडे वाटचाल होत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
---------------------
सातत्यपूर्ण सेवा व योग्य औषधोपचार करतानाच रुग्णांना मानसिक बळ दिले. त्यामुळे कोरोनाशी लढण्याची त्यांची ताकद वाढली. रुग्ण कोरोनावर विजय मिळवून आरोग्यदायी जीवन जगत आहेत. हा वसा यापुढे कायम जपणार आहोत.
- डॉ. सागर गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी, कोनांबे
-------------------------
विलगीकरण केंद्रात तत्काळ उपचार
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाबाधितांची हेळसांड होऊ नये व तत्काळ उपचार मिळावेत याकरिता ग्रामपंचायत कोनांबे अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कोरोनाबाधित रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. ग्रामपंचायत निधीमधून औषधे खरेदी करण्यात आली. रुग्णांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, वीजपुरवठा, फॅन आदी सुविधांयुक्त वातावरण विलगीकरण कक्षात निर्माण करण्यात आले. त्याचा चांगला फायदा झाला. रुग्ण बरे होऊन घरी परतले.
------------------------