नाशिक : देशभरात १०० जागा केवळ ५०० ते १००० मतांच्या फरकाने आमच्या हातून गेल्या आहेत. मालेगावमध्येही त्याचा प्रत्यय आम्हाला आला. निवडणूक आयोगाचा दबाव त्यात स्पष्ट होत होता. आता तर उद्धव ठाकरे यांनाही आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल असा इशारा उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिला. सांगलीतील जागेबाबत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साथ न दिल्याचा आरोपही केला.
विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आमच्या किमान १०० जागा अत्यंत कमी मतांनी गेल्या. गेल्या म्हणजे त्या ओरबाडून नेल्या. केंद्रात जेव्हा सत्तापालट होईल त्यावेळी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर करू, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवायला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
त्यांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण, सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, शरद पवार जास्त जागा म्हणजे सगळ्याच तर घेणार नाहीत ना, त्याबाबत बैठकीत ठरवू असा उल्लेख त्यांनी केला. अद्याप बैठक झाली नसून लवकरच ती होईल असेही ते म्हणाले.
शिक्षक वर्गाला बाजारात ओढू नका...मुख्यमंत्री पुन्हा नाशिकला येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नका, पैसे वाटपाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये २० कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर शिक्षक या वर्गाला बाजारात ओढू नका. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे हे सर्व पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.