निफाड (नाशिक) : लोकसभा निवडणुकीत कांद्याने कंबरडे मोडले, आमची चूक झाली, माफ करा, आता कांदा निर्यातबंदी करायची नाही, अशी अगतिक भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी निफाड येथे जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात बोलून दाखवली.
जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी करायची नाही. आम्हाला लाँग टर्म राजकारण करायचे आहे, औट घटकेचे नाही. उद्या लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. खोटा नॅरेटिव्ह कोणी सेट केला तर त्याला बळी पडू नका, ज्यांनी जिल्हा बँक मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका. असेही पवार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या लाभाबाबतचे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात पाच भगिनींना यावेळी देण्यात आले.
जो बुंद से गयी वो, हौदसे नहीं आती, आता माफी मागून काय फायदा आहे? तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी होती. कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला. त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता. निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी याचे प्रायश्चित्त सरकारला निश्चितच देतील- जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट