लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : आरक्षण जाणार, संविधान बदलणार यासारख्या अपप्रचाराचा सामना करण्यात आम्हाला यश आले नाही. त्यातच उमेदवार देण्यात झालेला विलंब, कांदा आणि स्थानिक प्रश्नांमुळे आमचा घात झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दिली. विधानपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेकडून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाशिक येथे आले असता मुख्यमंत्री बोलत होते.
आरक्षणाच्या मुद्यासह शेतकरी आणि इतर प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील आणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होईल, असे संकेतही त्यांनी दिले. मराठा- ओबीसी वाद होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठीही काही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर दिलेल्या शब्दावर ठामशिक्षकांच्या प्रश्नांवर मी यापूर्वी दिलेल्या शब्दावर ठाम आहे. आचारसंहिता संपताच त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुकांमुळे आपला पराभव झाला. मात्र आता त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असे सांगत आमचे देणारे सरकार आहे; घेणारे नाही, अशी टीका करीत मोदी हटाव या एकाच कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या विरोधकांना खोटा प्रचार करूनही जनतेने सत्तेत बसवले नाही. सत्ता मिळाली नाही तरी ते आनंदोत्सव सागरा करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.