नाशिक : मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आलीच शिवाय विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याने या घटनेचा ‘आम्ही नाशिककर’ या पर्यावरणप्रेमी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत आरे कॉलनीतील झाडे नष्ट करण्याच्या प्रकाराला विरोध करण्यासाठी नाशिकमध्ये मोहीम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मेट्रो कार शेडसाठी गोरेगावमधील आरे कॉलनीत वृक्षतोड न करता सदर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी मागणी करीत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लढा उभारलेला आहे. या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर रात्रीतून हजारो वृक्षांवर कुºहाड चालविण्यात आली. पर्यावरण प्रेमींना तेथे पोहचता येऊ नये म्हणून कलम १४४ लावण्यात आले, मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात करण्यात आले होते.पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या पाठीशी उभे राहत नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्था ‘आम्ही नाशिककर’ यांच्या वतीने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये वृक्षतोडीचा निषेध करण्यात येऊन आंदोलकांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले. याप्रकरणी आता येत्या २१ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत सदर वृक्षतोड थांबली आहे. राज्य सरकारने आणि एमएमआरडीने ज्याप्रकारे अत्यंत हेकेखोरपणा दाखवत वृक्षांवर घाव घातले त्याचा निषेध करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र सैनिक वसंतराव हुदलीकर, पर्यावरण सल्लागार एन. एम. भामरे, लोकाधार संस्थेचे वासंती दीक्षित, मुकुंद दीक्षित, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते.
आरे वृक्षतोड प्रकरणी ‘आम्ही नाशिककर’कडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:35 PM