नाशिक- गेल्या बारा वर्षांपासून मी भूमाफियांमुळे पीडित आहे. हे माफिया समेार न येताच त्रास देतात. मी खूप लढलो परंतु राजकीय नेते आणि पोलीस दलाकडून मदत झाली नाही. नाशिकमधील एका केसमुळे माझ्या डेाक्यावरील केस तर गेले पण ११ वर्षे पद्मश्रीला मुकल्याची खंत प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी मंगळवारी (दि. ३) व्यक्त केली.
नाशिकमध्ये सुरेश वाडकर यांनी जमीन खरेदी केली होती. त्यावरून बरेच वादविवाद झाले हाेते. त्यानंतर आत्ता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी त्यांना या प्रकरणात मदत केली आहे. पोलीस आयुक्तांनी भूमाफियांच्या विरोधात तयार केलेल्या माहितीपटाचे उद्घाटनही नेमके वाडकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.३) करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वाडकर यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाशिकमधील वादग्रस्त भूखंड खरेदीतून अडचणीत आलेल्या वाडकर यांनी आपल्याला आलेले कटू अनुभव करताना यामुळेच आपण देश सोडून जाण्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले. गेलेली बारा वर्षे मला भूमाफियांचा त्रास सहन करावा लागला, आम्ही तुमचे फॅन आहाेत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी मदत केली नाही, ती त्यांच्याकडे खूप याचना केली परंतु उपयोग झाला नाही, असे सांगताना त्यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा उल्लेख केला. तावडे यांनी मदतीचे आश्वासन दिले पण मदत केली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ठरवले असते तर नक्की मदत करू शकले असते पण तसे झाले नाही अन्य मोठ्या नेत्यांकडे देखील मदत मागितली; मात्र कोणीच पुढे आले नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला. यापूर्वीच्या अनेक पाेलीस आयुक्तांनीही सहकार्य केले नाही. न्यायासाठी पाेलीस आणि राजकारणी यांचे उंबरे झिजवले परंतु उपयोग झाला नाही. दु:खी झाल्याने आणि माझ्याच देशात मला न्याय मिळत नसल्याने मी या देशात का राहावे असा उद्विग्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना ते खाकीतील माणूस आहेत, असे वाडकर म्हणाले.